स्वप्निल राजशेखर यांची मुलाखत

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. कोल्हापूरला ऐतिहासिक व धार्मिक महत्व असून शहराला "कलापूर' म्हणूनही ओळखले जाते. बरेच नामांकित कलावंत आजपर्यंत कोल्हापूरने दिले आहेत. चित्रकला, शिल्पकला, नाटक, सिनेमा, लावणी अशा अनेक लोककलांचा वारसा कोल्हापूरने जतन केला आहे.

कला क्षेत्रात कोल्हापूरचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्यांमध्ये सुर्यकांत मांडरे, चंद्रकात मांडरे, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, गणपत पाटील, आशुतोष गोवारीकर, भगवान दादा, गायक सुधीर फडके, जगदीश खेबुडकर, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, आशा भोसले, दादा कोंडके यांच्यासारखे दिग्गज अभिनेते, तसेच खलनायक राजशेखर इ. दिग्गज कलावंतांची मायभूमी कोल्हापूर आहे. कोल्हापूरच्या मातीत हे कलाकार घडले आणि त्यांनी जगाला कोल्हापूरची ओळख करून दिली. आजच्या पिढीतील नवोदितांनी हा वारसा जोपासत वृद्धिंगत केला आहे.

राजशेखर यांचे ज्येष्ठ चिरंजीव स्वप्निल राजशेखर यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा अत्यंत खंबीरपणे जोपासला आहे. ते आजच्या पिढीचे कलाकार आहेत. स्वप्निल राजशेखर यांनी अगदी आपल्या बालवयात सिनेमामध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांची घोडदौड आजही चालू आहे.

# कलावंत ओळख #

नांव : स्वप्निल राजशेखर भूतकर
जन्म : 31 मे 1976 जन्मस्थळ : कोल्हापूर
शिक्षण : बी.ए.(समाजशास्त्र), न्यु कॉलेज, कोल्हापूर.
कार्यक्षेत्र : सिनेमा, टी.व्ही मालिका, नाटक

पहिला सिनेमा :

तमास्गीर - वय 7 वर्षे (बालकलाकार)

सिनेमा : भंडारा (2010), हिरवं कुंकू (2006), अपहरण (2008),भावाची लक्ष्मी, अचानक (2008), लेक लाडकी (2010),चंद्रकला (2010), नाथा पुरे आता (2011), दुर्गा म्हणत्यात मला, राजमाता जिजाऊ (2011), बालगंधर्व (2011), तीन बायका फजिती ऐका, हाय कमांड (2012), सात बारा कसा बदलला, छोडो कलकी बाते (2012), तुझ्याविना (2012), पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा (2014), नजर (2015), कट्यार काळजात घुसली (2015), पोलिस लाईन (2015), माणुस (2017)

नाटक :

एकच प्याला (2017)

टीव्ही मालिका : खेळ मांडला (मी मराठी) - वाकडे सरकार, राजा शिवछत्रपती (स्टार प्रवाह) - नेताजी पालकर , कुलस्वामिनी (स्टार प्रवाह) - यशोधन इनामदार, वीर शिवाजी (कलर्स मराठी) - कान्होजी जेधे, स्वप्नांच्या पलिकडले (स्टार प्रवाह) - कौशल निमकर, अजूनही चांदरात आहे (झी मराठी) - सुर्यकांत सर्नौबत, चार दिवस सासूचे (झी मराठी) –राजन फडके, झुंझ मराठमोळी (ई मराठी), जय मल्हार ( झी मराठी)– इंद्र देव, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला (कलर्स मराठी)– राजशेखर पुरोहित

लेखक : बलुतं, (लघु चित्रपट)
दिग्दर्शक : एकला चलो रे, सावटं (लघु चित्रपट)

जाहिरात क्षेत्र : मॉडेल म्हणून बजाज टेम्पो ट्रॅव्हलरच्या जाहिरातीमध्ये लिड रोल इएलएफ इंजिन ऑईल, बिर्ला प्लस सिमेंट आदी जाहिरातीमध्ये काम

Awards And Nominations :


2010: Nominated in Marathi TV Biggies Awards for "Best Actor in a Negative Role" for Khel Mandla (TV Series) [Mi Marathi]
2012: Won "Gumphan Award for Excellence in the Field of Entertainment"
2015: Documentary Film, Ekla Chalo Re was nominated in the "4th My Mumbai Short Film Festival".
2016: Won an Award for Best Screenplay, for the Short Film titled Baluta at the first Haryana International Film Festival 2016.
2016: Won an Award for Best Screenplay, Jury at the 5th Mumbai Shorts International Film festival for a Short Film titled Saavat
2017: Won an Award as the Best Director at the 4th Sangli International Film Festival for the Short Film Saavat
2017: Won an Award as the Best Director at th 2nd Karad National Short Film Festival for the Short Film Saavat
2017: Won an Award as the Best Director at th 7th Gujarat International Short Film Festival for the Short Film Saavat
2017: Nominated in Zebra International Film Festival, for Best Story, for the Short Film Baluta

आपण किती टी.व्ही. शोमध्ये काम केले आहे ? करत आहात ?

उत्तर :- मी माझे करिअर 1995 मध्ये सुरू केले. त्यावेळी मी कोंडमारा, शेजार, भुमीपुत्र, रेशीमगाठी अशा टी.व्ही. मालिकांमधून काम केले. सदरच्या मालिका झी मराठीवर प्रदर्शित झाल्या. तसेच मी स्टार प्रवाह या चॅनलवरील राजा शिवछत्रपती या मालिकेमध्ये नेताजी पालकर यांची भूमिका केली. स्टार प्रवाहसाठी कुलस्वामिनी या मालिकेत मी यशोधन इनामदार ही भूमिका पार पाडली आहे. तसेच "मी मराठी' या चॅनलसाठी "खेळ मांडला' या मालिकेत काम केले आहे. यामध्ये वाकडे सरकार यांची नकारात्मक भूमिका पार पाडली होती. या भूमिकेचे नामांकन ""मराठी टी.व्ही. बिग्गीज ऍवॉर्डस्‌' साठी ""सर्वोत्कृष्ठ अभिनेता नकारात्मक भूमिका'' यासाठी 2010 मध्ये झाले होते. तसेच ‘‘कलर्स’’ चॅनलसाठी ‘‘वीर शिवाजी’’ या मालिकेत मी कान्होजी जेधे व ‘‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’’ यामालिकेमध्ये ‘‘राजशेखर पुरोहित’’ यांची भूमिका मी साकारली होती. याचबरोबर ‘‘चार दिवस सासूचे’’ या ‘‘झी मराठी’’ वरील मालिकेत राजन फडके अशी भूमिका केली, ‘‘ई टी.व्ही.’’ वरील ‘‘झुंझ मराठमोळी’’या रिॲलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. ‘‘झी मराठी’’ वरील प्रसिद्ध मालिका ‘‘जय मल्हार’’ मध्ये इंद्र देव ही भूमिका साकारली. आज मोठ्या पडद्याबरोबर लहान पडद्यावर येवून लोकांसमोर येण्याची प्रथा आहे. प्रत्येक अभिनेता मोठ्या पडद्याबरोबर लहान पडद्यावर काम करून प्रसिद्धी मिळवताना दिसतात. कारण आपण टी.व्ही. मुळे प्रत्यक्ष लोकांच्या घरात पोहचतो. आपल्या कामाची खरेच स्तुती होते. म्हणून टी.व्ही. मालिकेमध्येही काम करत राहण्यास महत्व आहे.

आपण कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे ?

उत्तर :- सर्वप्रथम मी 7 वर्षाचा असताना एक बालकलाकार म्हणून ‘‘तमास्गीर’’ या चित्रपटात काम केले आहे. हिरवकुंकू (2006), अपहरण, अचानक (2008), लेक लाडकी (2010) भंडारा (2010), चंद्रकला (2010), नाथा पुरे आता (2011), बालगंधर्व (2011), सात बारा कसा बदलला? (2011), राजा शिवछत्रपती, छोडो कलकी बाते (2012), हाय कमांड 2012), तुझ्या विना (2012), तीन बायका फजिती ऐका (2012) पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा (2014), नजर (2015), कट्यार काळजात घुसली (2015), पोलिस लाईन (2016), माणुस (2017) इ. चित्रपटांमध्ये काम केले आहे. काम अजूनही चालू आहे. अजून बरेच काम करायचे आहे. वडीलांच्यासारखं यश मिळवायच आहे. माझे वडील माझे आदर्श आहेत. आयुष्यात त्यांच्या इतकं जरी काम मला करता आल तरी मी मला धन्य मानीन. मराठी चित्रपटाला शासनाकडून बऱ्याच सुविधा मिळत आहेत. त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे.

आपण या क्षेत्रात काम करून समाधानी आहात ?

उत्तर :- चित्रपट, टी.व्ही. यामध्ये अभिनय करणे हे आज मला खूप आवडतंय. मी वयाच्या 7 व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम केले. खरतर अभिनयाचा वारसा मला माझ्या वडिलांच्या कडून मिळाला. मला या क्षेत्रात काम करायला आवडतं. लोकांच्यामध्ये अभिनेता म्हणून ऐकून घेणे मला आवडतं. मी आजही कठोर परिश्रम घेत आहे कारण माझ काम लोकांना आवडावे, त्यांच्या पसंतीस पडावे यासाठीच मी प्रयत्नशील असणार आहे.

आपल्याला कोणत्या प्रकारच्या भुमिका करायला आवडतात ?

उत्तर :- जर तू हा प्रश्न कोणत्याही कलाकाराला विचारलास तर तुला हेच उत्तर मिळेल की सगळ्याच पद्धतीचे रोल करायला आवडतात. कारण एक अभिनेता सर्वांगाने परिपूर्ण असायला हवा. असे होऊ नये की हा अभिनेता फक्त व्हिलन रोल करतो, विनोदी (कॉमेडी) रोल करतो. किंवा हा अभिनेता हिरो रोल करतो. अस व्हायला नको पण आपल्याकडे तसे स्टम्प्स पडत जातात. जस वडिलांच्या बाबतीत झाल. खरतर त्यांच कॉमेडीचं टायमिंग खूप छान होत, अफाट होत. मी त्यांची स्टेजवरची काम पाहिली आहेत. पण आज राजशेखर म्हटल्याबरोबर आपल्याला व्हिलन (खलनायक) डोळ्यासमोर येतो, असे शिक्के आपल्याकडे बसत जातात.

मला विचारशील तर मी खूप दिवस कॉमेडी भुमिका केलेली नाही. मी सुरूवातीच्या फेजमध्ये पहिल्या दोन-तीन सिनेमामध्ये कॉमेडी भुमिका केल्या होत्या. त्यातला एक सिनेमा ""सांग प्रिये तु कुणाची'', त्यानंतर मी हिरो रोल केले, जास्त निगेटिव्ह रोल केले. आता असं वाटतय की खुप दिवसांनी कॉमेडी करायला हव. अस नाहीकी कोणतेही काम सतत करायला हव. कारण जर मी सतत कॉमेडी केली तर मला निगेटिव्ह करायला आवडेल किंवा हिरो करायला आवडेल. सतत जर हिरो केला तर मला आणखी काही करायला आवडेल. एका कलावंताला खरतर सगळ्या पद्धतीच्या भुमिका करायला आवडतात. पण एक महत्वाच, जे काम करून स्वत:ला समाधान मिळत, फक्त पैसे नाही अस काम करायला आवडत. ते काम केल्यावर अस वाटल पाहिजे की आज मी चांगलं काम केल.

आपण आपल्या क्षेत्रात आदर्श कलाकार कोणाला मानता ?

उत्तर :- या प्रश्नाच थोडक्यात उत्तर देण मला मला खूप कठिण आहे. कारण मी हॉलिवूड, बॉलीवूड, मराठी तसेच अनेक भाषेतील फिल्म बघणारा माणूस आहे. तर इतक्या सगळ्या कलाकारांची, इतकी सगळी काम मला आवडलेली आहेत, इतके सगळे कलाकार मला आवडतात, पण एका कोणाच नाव घेण कठिण आहे. मला चार्ली चॅपलिन प्रचंड आवडतो. मला रॉबर्ट डी नीरो खूप आवडतो, अल पचिनो आवडतो, झिम कॅरी आवडतो, क्रिस्तोन बेल आवडतो, मॅक डेमॉन आवडतो.

हिंदीमध्ये अमिताभ बच्चन आदर्श आहेत. नसरूद्दीन शहांचा मी हार्ड कोअर फॅन आहे. मला दिलीपकुमार साहेब आवडतात. स्पेशली ज्या काळात त्यांनी काम केल, ब्लॅक ऍन्ड व्हाईट च्या जमान्यातील फिल्म्समध्ये म्हणजेच फुटपाथ, अमर, दाग, मेला, कोहिनूर, देवदास, गंगा जमुना अशा फिल्मध्ये दिलीपकुमारांच काम बघितलं की त्यांच्या प्रेमात पडत.

मराठीमध्ये मोहन गोखले नावाचा ऍक्टर बराच आवडायचा. मला नान पाटेकर साहेबांचे काही रोल खूप आवडलेत. मला माझ्या वडिलांची (राजशेखर) कामे खूप आवडली आहेत. हे फिल्म गणिग आहे. एखाद्या फिल्ममध्ये एखादा खूप आवडून जातो, आणि मग तो आदर्श ठरत जातो, की आपल्यालाही असा रोल कधीतरी करता यायला हवा. यातील 5% तरी यायला हव. जसा अमिताभ बच्चन स्क्रिनवर इन्टेन्स लूक देतात, जर मला तसा लूक देता आला तर मी सगळीकडे नट म्हणून मिरवेन. अमिताभ बच्चन सगळ्या गोष्टीत आदर्श आहेत की एका ऍक्टरनी परफॉर्मन्स कसा द्यावा, एका ऍक्टरनी आपल्या कामात किती पर्टिक्युलर असावं. उदा. वक्तशीरपणा, कामावरची निष्ठा, सगळ्या को-आर्टिस्टशी चांगली वर्तणुक अशा सर्वांगीण बाबतीत अमिताभ बच्चन आदर्श आहेत.

अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला यशस्वी बनवितात ?

उत्तर :- पहिली गोष्ट टॅलेन्ट, त्याच्यानंतर हार्डवर्क, स्वत:ला डेव्हलप करणे. मग मार्केटिंग महत्वाच आहे. मिळालेल काम तुम्ही तुमच्या टॅलेन्ट आणि व्यक्ती म्हणून कस टिकवता आणि त्यातून पुढची कामे कसे मिळवता. एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच तुम्ही चांगला माणूस असणं गरजेचं आहे. आमच्या क्षेत्रात काही गोष्टी पाळाव्या लागतात. त्या म्हणजे प्रोड्युसरचे काम वेळेत करून देणे, वक्तशीर असणं, दुसऱ्याच्या कामात लक्ष न देणं, आपल्या कामाशी आपण अत्यंत प्रामाणिक असणं, या सर्व गोष्टींची खूप गणना होते. काही वेळा ऍक्टिंग जराशी कमी असली तरी चालते, पण वरील सर्व गोष्टी चांगल्या असतील तर लोक म्हणतात हा चांगला माणूस आहे. याला कास्ट करूया. तर मिळालेले काम तुम्ही कसं टिकवता आणि मग लक फॅक्टर आहे.

म्हणजे आपल्या मते लक फॅक्टर हा लास्ट आहे ?

उत्तर :- माझ्या मते लक हा लास्ट असतो पण हे परत व्यक्तीसापेक्ष आहे. काही असे आर्टिस्ट असतात की ज्यांना पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश मिळत. जरी त्यांच्याकडे टॅलेन्ट कमी असल तरी लक जबरदस्त असत. काही जण बरेच दिवस काम करत राहतात, एक दिवशी त्यांचं भाग्य उजळत, तर हे व्यक्तिसापेक्ष ठरत जातं. या सर्वाचा सुवर्णमध्य तसेच सगळ्या गोष्टी एकवटल्यावर यश मिळतच. फार कमी असं होत की नशीब जोरावर आहे. कारण टॅलेन्ट आणि हार्डवर्क महत्वाच्या असतातच.

आपला आवडता नायक ?

उत्तर :- ह्रतिक रोशन, कारण हिरो म्हटल्यावर डोळ्यासमोर येत की सहा फूट उंची, मस्त देखणा रेखीव चेहरा, अत्यंत बांधेसुध कमवलेल शरीर, डान्स उत्तम आणि अभिनय. या सगळ्या गोष्टी एका उत्तम हिरोमध्ये असायला हव्या. या सर्व गोष्टी ह्रतिक कडे आहे. आज आपले चांगले ऍक्टर हॉलीवूडमध्ये काम करतात. इरफान खान, ओम पुरी, अमिताभ बच्चन काम करतात. हॉलीवूडमधला जेम्स बाँड जो कम्प्लिट हिरो आहे. ज्याच पात्र लार्जर दॅन लाईफ अस पात्र आहे. त्याला जर भारतामधून रिप्लेसमेंट हवी असल्यास ह्रतिक रोशन त्याला योग्य आहे. रूढार्थाने हिरो म्हणून ह्रतिक हा योग्य आहे.

आपली आवडती नायिका कोण ?

उत्तर :- मला काजोल आवडते. मला ऐश्वर्याची काही काम आवडली. काजोलची आई तनुजा आवडते, स्मिता पाटील, नंदिता दास, रेखा, वैजयंतीमाला, शबाना आझमी इ. शबाना आझमीच्या पेस्तनजी या फिल्ममधील मंडीमध्ये काम केलेल्या रोलच्या मी प्रेमात पडलो.

आपण आपल्या क्षेत्रात काम करताना कोणत्या नवीन गोष्टी शिकलात ?
उत्तर :- मी सुरूवातीला शैलीदार अभिनेता म्हणून काम सुरू केल. पण आज शैलीदार अभिनेत्याचा जमाना नाही. आता वास्तववादी अभिनयाचा जमाना आहे. म्हणजेच तुमच्या सर्व गोष्टी नैसर्गिक वाटाव्यात. अभिनय करत आहात, असं वाटल नाही पाहिजे, याला महत्व आहे. जेव्हा मी सिनेमात पहिली काही कामे केली तेव्हा मी खूप शैलीदार अभिनयाचा प्रयत्न करीत असे. मी माझं परिक्षण केल्यावर लक्षात आल की मी खूप ओव्हर ऍक्ट करतो. मी जी वर नांवे सांगितली, यांची काम पाहिल्यावर माझ्या लक्षात आल. आता तुम्ही अभिनय न करण म्हणजेच चांगली ऍक्टिंग करणं अशी व्याख्या आहे. पहिली गोष्ट मी शिकलो ती शैलीदार अभिनय शक्यतो टाळणे. जर भुमिकेची गरज असेल तरच शैलीदार अभिनय करणे. उदा. जसे माझा वाकडे सरकार (खेळ मांडला) होता, तिथे तो शैलीदार अभिनय असण गरजेच होत.

आपल्या मते टि.व्हि. मालिका, चित्रपट यामध्ये काम करण्याचा अनुभव कसा वाटतो ?

उत्तर :- दोन्ही माध्यमांमध्ये काही फरक आहेत. जसे सिनेमा हा एका ठराविक शेड्युलमध्ये मध्ये पूर्ण होतो. एक शेड्युल दोन शेड्युल मध्ये पूर्ण होतो. म्हणजे तुम्ही जो रोल प्ले करता, तो साधारणत: 10-12 दिवस किंवा 10-12 दिवसांच्या एका शेड्युलनंतर पुढच्या एक महिन्याने 10-12 दिवस अस तुम्ही ते शेड्युल मध्ये करता तर ते पात्र तुम्हाला खुप थोडा वेळ कॅरी कराव लागत, ऍक्टर म्हणून. टि.व्हि. सिरीअल करताना तुमची सिरीअल वर्ष-सहा महिने किंवा त्याच्याही पुढे अशी चालू असते. तर ते जे तुम्हाला पात्र सांभाळाव लागत ते ती सिरिअल चालू आहे तोपर्यंत सांभाळाव लागत. हा मुळ फरक आहे. दुसरी गोष्ट काम करण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. सिरीअलला एक आर्टिस्ट जेंव्हा आपली डेट देतो, तेव्हा दिवसभरातून त्याच्याकडून कमीतकमी 10-12 सिन्स करून घेतले जातात. कमीत कमी व जास्तीत जास्त याला लिमिट नाही. म्हणजे मी 22 सिन्ससुद्धा एका दिवसात केलेले आहेत. सिनेमाला एका दिवसात 5-6 सिन्स फारफार तर होतात. त्यामुळे सिनेमात तुम्हाला शारिरीक किंवा मानसिक ताण जाणवत नाही, जो सिरीअलमध्ये जाणवतो. आणि रोज रोज जाणवत राहतो. तुम्ही जर डेली सोपमधलं जर मुख्य पात्र करत असाल तर तुम्ही रोज रोज रोज रोज त्यातच असता तर ते, ते सांभाळण्यासाठी तुमची शारिरीक मानसिक ताकद जी आहे ती तुम्हाला प्रचंड वाढवावी लागते, असे काही फरक आहेत सिनेमा आणि सिरीअलमध्ये.

सिनेमा आणि सिरीअलमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमध्येपण तफावत आहे. सिनेमा बघणारा वर्ग वेगळा आहे, सिरीअल बघणारा वर्ग वेगळा अहे. सिरीअलमुळे तुम्ही अक्षरश: घराघरात पोहोचता तर तुम्हाला दोन्हींचा एक सुवर्णमध्य साधावा लागेल. म्हणजे तुम्ही सिरीअल पण करत राहा आणि सिनेमा पण करत राहा. तर असे दोन्हीत फरक असल्यामुळे माझ्या मते दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्याची मज्जाच वेगळी आहे. ऍक्टर म्हणून दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. सिरीअल्स करण हा एक वेगळा फंडा आहे. त्याच्याशी जर तुम्ही जुळवून घेतलात तर उद्या सिनेमा करताना तुम्ही तितकेच कम्फर्टेबल असायला हवात. सिरीअलमध्ये तुम्हाला टेक्निकल सपोर्ट भरपूर असतो. तुम्हाला तुमच्या एक्स्प्रेशन्सना एक्स्पोज करायला तांत्रिकदृष्ट्या खूप सारी माणसं सतत काम करीत असतात. जस मी म्हटलं की, एक शॉट 3-4 अँगलनी ट्रॉली, म्युझिकच्या सहाय्याने प्रसंगाची तीव्रता प्रेक्षकांच्या मनात उतरविता येते.

सिनेमामध्ये अस होत नाही, सिनेमामध्ये अजूनही अभिनयाच्या बळावरच ते पोहचवाव लागत. हा एक वेगळा फरक आहे. त्यातली एक वेगळी गंमत आहे. तर दोन्हीमध्ये काम करण्याचा आनंद वेगळा आहे. पण प्रत्येक ऍक्टरने तो घ्यावा, अशा मताचा मी आहे. मी दोन्हीकडे एन्जॉय करतो. खूप दिवसांपासून नाटक केलेले नव्हते. स्टेजवर काम करण्याची एक वेगळी अफाट मजा असते. मला स्टेजवर काम करायचे होते त्यासाठी मी नवीन नाटकं शोधत होतो,. आज मी ‘‘एकच प्याला’’ हे नाटक करत आहे.

सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल आपलं मत काय आहे ?

उत्तर :- सध्याच्या मराठी सिनेमाबद्दल म्हणाल तर, टेक्निकली सिनेमे उत्कृष्ठ होत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता मराठी सिनेमात पैसा दिसायला लागला आहे. चांगली लोकेशन्स, चांगली कॉस्ट्युम्स, चांगल्या पद्धतीचे सेटस्‌ज्यामध्ये श्रीमंती दिसते. अशा पद्धतीचे टेक्निकली चांगले असे सिनेमे आपल्याला बघायला मिळत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विषयाच्या दृष्टीने म्हणाल तर, वेगवेगळे विषय यायला लागलेत. त्यातले मोजके का असेना पण सिनेमे चालत आहेत. लोक काही कारणाकरीता बघायला गर्दी करतात, लोक ब्लॅकने तिकिटे घेवून सिनेमा बघायला जात आहेत. थिएटरवरती मराठी मुले घरातील मंडळींना घेवून सिनेमे बघत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्याची कारण काय हा भाग वेगळा आहे. पण लोक सिनेमा बघायच्या तयारीत आहेत. काही गोष्टींबद्दल तितकेसे समाधान नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत की स्क्रिनप्ले, स्टोरी याचा जितका सक्षम अभ्यास व्हायला हवा, तितका होताना दिसत नाही (काही उत्तम अपवाद वगळता). एक सिनेमा बघितल्यानंतर एक निख्खळ आनंदा व्हावा. की वाह ! काय अप्रतिम सिनेमा बघितला. असा निख्खळ आनंद अजूनही बघायला मिळत नाही (काही उत्तम अपवाद वगळता). कारण फक्त टेक्निक सिनेमाला तारत नाही. सिनेमा चालतो किंवा लोकांना आवडतो वा बांधून ठेवतो तो उत्तम कथा, पटकथा, उत्तम अभिनय, उत्तम संगीत या चार बेसिक गोष्टींवरच सिनेमाचे यश अवलंबून असते. या चार गोष्टी तगड्या असतील आणि आताच्या काळात त्याच मार्केटिंग उत्तम असेल तर तो सिनेमा सक्सेसफूल व्हायला हरकत नाही. फक्त टेक्निकली सगळे चांगले आहे, आणि कथेत दम नाही तर तो सिनेमा चालणार नाही. शाळा, काकस्पर्श, बालक पालक, श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी इ. चित्रपट लोकांना खूप आवडले. हरिश्चंद्राची फॅक्टरी ही फिल्म मला सर्वोत्तम वाटते. तसेच ही फिल्म गेल्या दशकातील उत्कृष्ठ आहे असे मला वाटते, याचे कारण सशक्त पटकथा, कथेकडे पहाण्याचा एक अत्यंत वेगळा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन महत्वाचा होता. उत्तम अभिनय, दिग्दर्शकाचे कौशल्य अप्रतिम होते. सर्वांगीण दृष्टिने एक चांगला सिनेमा म्हणाल तर तो हरिश्चंद्राची फॅक्टरी.

मराठी सिनेमामध्ये स्टार या कन्सेप्टबद्दल काय वाटते ?

उत्तर :- स्टार या कन्सेप्टबद्दल तुम्ही विचारलात तर आजची स्टार कन्सेप्ट खूप बदललेली आहे. माझ्या वडिलांच्या (राजशेखर) काळामध्ये जर तुम्हाला स्टार व्हायचे असेल तर तुम्हाला उत्तम हिट सिनेमे, हिट नाटक तुमच्या नावावरती असणे गरजेचे असायचे. आज ही स्टार कन्सेप्ट खूप बदललेली आहे. तुम्ही एखादी सिरीअल किंवा रिऍलिटी शो केलात की तुम्ही स्टार होता. तुम्हाला सेलिब्रिटीचे स्टेटस येते. त्यामुळे आज स्टार अमाप आहेत, जी एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. पूर्वी सुर्यकांत मांडरे, चंद्रकांत मांडरे, अरूण सरनाईक, निळू फुले, राजशेखर, डॉ. श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशी मोजकीच मंडळी स्टार असायची. बाकीची मंडळी दुसऱ्या फळीतली असल्यामुळे नेहमी उपेक्षित राहिली. त्यांना ना आर्थिक सुबत्ता आली ना कधी एक स्टार असण्याचा स्टेटस्‌अनुभवायला मिळाला. आजची परिस्थिती अशी आहे की, आज माझ्यासारखा अभिनेता, मी काय मोठा अभिनेता, ग्रेट ऍक्टर नसूनसुद्धा चार-सहा मालिकांमधून किंवा सिनेमामधून दर्शन झाल्यामुळे मला सेलिब्रिटी स्टेटस आलेले आहे. ही एका अर्थाने चांगली गोष्ट असली तरी दुसऱ्या अर्थाने ही गोष्ट चांगलीही नाही. कारण, यामुळे कदाचित मी आळशी होवू शकेन किंवा माझ्या मेहनतीत कमतरता येवू शकेल. पण असे होवू न देता मिळालेले स्टारडम टिकवणे गरजेचे आहे. सध्या एक सिरीअल करा किंवा एक रिऍलिटी शो करा, तुम्ही स्टार होवून जाता. इतके ते सहज वाटणही शक्य आहे. अशी ही दुधारी तलवार आहे. पण आपण ही गोष्ट चांगल्याच अर्थाने घेवू की, स्टार मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. चला, त्या निमित्ताने लोकांना कामतरी मिळत आहेत. काही लोक मुबलक पैसे कमवत आहेत. पूर्वी मराठी आर्टिस्टला जी सततची आर्थिक ओढाताण जाणवायची, ती संपत आहे, हा सगळ्यात मोठा फायदा आहे.

आतापर्यंतच्या कामात आपले आवडते पात्र कोणते ?

उत्तर :- खरं सांगायचे तर मी माझ्या सुदैवाने आणि दुर्दैवाने मला स्वत:च्या मर्यादा, स्वत:ची कुवत खूप लवकर कळाली, ती माझ्या भुमिकेमुळे. एखादी भुमिका आणखी किती चांगली होवू शकते ? तो रोल आणखी किती उत्तमरित्या होवू शकतो ? तो करणारा जर आणखी ऍक्टर असेल तर तो आणखी किती छान करू शकतो ? याची मला पूर्वीपासून कल्पना असल्यामुळे मी आतापर्यंतच्या माझ्या कामाने फारसा इंप्रेस नाही. मी अजूनही स्वत: डेव्हलप होण्याची गरज असल्याचे मला वाटते. यामध्ये अजिबात खोटा विनय नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी विनयाने उगाच असे बोलतोय अशातला भाग नाही. पण हा त्यातल्या त्यात जर तुम्ही असे विचारले की माझे कुठले रोल बरे झाले असे आपण म्हणूया. तर मला नेताजी पालकरांच्या रोलने खूप समाधान दिले. त्याच एक कारण वेगळे असे की मुळ राजा शिवछत्रपतीमधला नेताजी पालकर हा रोल लिहून आला होता ती भाषा अत्यंत शुद्ध, प्रमाण मराठीतली होती. मी दिग्दर्शकांना सुचविल आणि ते डायलॉग कोल्हापूरी भाषेत बोलून दाखविले. दिग्दर्शकांना ते आवडले. खरं तर नेताजी पालकर हे मावळ प्रांतातले. पण दिग्दर्शकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मी त्या रोलने नेताजी पालकर हे कोल्हापूरच्या मातीतले आहेत, असे दाखवले. जी भाषा मराठीमध्ये आजपर्यंत अरूण सरनाईक, राजशेखर, सुर्यकांत, चंद्रकांत यांची ऐकत आलो आणि खूप वर्षात मराठी पडद्यावरती ही भाषा आपण ऐकली नव्हती, ती भाषा आणण्याचा मी प्रयत्न केला, आणि ते मला स्वत:लाही आवडले. सर्वार्थाने खूप छान भूमिका मी केली किंवा नेताजी पालकर अजरामर केले अस नाही. पण मी माझ्या परीने चांगला प्रयत्न केला. त्यातला तो माझा रोल मला आवडला.

माझा स्वप्नांच्या पलिकडलेमधील रोल मला ठिकठाक वाटला कारण तो माझा पहिलाच बिनमिशीचा रोल होता. कारण माझे इतर टी.व्ही. वरच्या सर्व रोलमध्ये मला मिशा आहेत. माझा पहिला रोल की ज्यामध्ये मी नॅचरल जसा मी आता तुमच्यासमोर बसलेलो आहे, तसा आलो. आणि ते कॅरॅक्टर मला यासाठी आवडते की त्यात माझा वैयक्तिक फायदा झाला. पुण्या-मुंबईतले लोक या रोलमुळे मला ओळखायला लागले. पूर्वी मी मिशी काढली किंवा मी गेटअपमध्ये नसेन त्यावेळी मला ओळखण कठिण जायचे. स्वप्नांच्या पलिकडलेमुळे असे झाले की, मी माझ्या आहे त्या रूपामध्ये दिसतो. आणि त्यामुळे बाहेरचे लोकसुद्धा मला ओळखायला लागले.

आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी कोणती आहे असे आपल्याला वाटते ?

उत्तर :- माझी सर्वोत्तम कामगिरी म्हणाल तर माझ्या मर्यादेमध्ये मी जे तुम्हाला वरती सांगितले काही रोल. एक आणखी काम मला स्वत:ला फार आवडले ते म्हणजे. खेळ मांडला यामध्ये मी वाकडे सरकारांची केलेली भूमिका. त्याचे डायलॉग मी स्वत: लिहिले. सुरूवातीचे 30 एपिसोड पर्यंतचे सर्व डायलॉग मी लिहिले आहेत, जे खूप छान आहेत. येथे मी तुम्हाला 100% सांगू शकतो की, उत्तम डायलॉग होते. वाकडे सरकार हे माझे आवडलेले सर्वोत्तम काम होते, अस मला वाटते.

आपण फावल्या वेळात काय करता ?

उत्तर :- फावल्या वेळात मी जमेल तितके सिनेमे पाहतो, जितके शक्य आहेत तितके थिएटरला जावून पाहतो. भरपूर वाचतो, फॅमिलीला वेळही देतो. रिलिज झालेली प्रत्येक चांगली फिल्म बघायचीच हा माझा अट्टाहास असतो. जर एखादी फिल्म चुकली तर मला अपराधीपणाची भावना येते. कामात व्यस्त असल्यामुळे जर एखादी फिल्म मला पाहता आली नाही तर त्याची ऑफिशियल डि.व्हि.डी. आणतो व पाहतो, हाच माझा स्वत:चा रियाज आहे. माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. मी सतत नवीन डि.व्हि.डी. विकत घेत असतो. आणि भरपूर बघत असतो. सिनेमे पाहणे हा माझा आवडता छंद आहे. सुदैवाने माझा व्यवसायही तोच आहे. दुर्देवाने आमच्या क्षेत्रात एक गोष्ट मला जी दिसते की, खूप सारे नट खूप व्यस्त असतात, म्हणून ते सिनेमे बघत नाहीत. पण सिनेमे बघायला हवेत. माझे असे म्हणणे आहे की, व्यस्त कामामधून थोडासा वेळ काढून मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करून सिनेमे पहावेत. कारण आमच्या व्यवसायामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट काय? प्रत्येक व्यवसायामध्ये जशी गुंतवणूक करावी लागते, तशीच वरील गोष्टी करणे ही आमच्या व्यवसायातील गुंतवणूक आहे.

एखादी चांगली फिल्म बरेच काही शिकवून जाते. तसेच एखादी वाईट फिल्मही बरेच काही शिकवून जाते की ही गोष्टी करायची नाही. मी स्वत: थिएटरला जावून फिल्म व नाटक बघतो. दुर्देवाने आपल्या कोल्हापूरात नाटकं खूप कमी होतात. शक्य तितकी नाटकं मी पाहतो. काही ऍक्टर्स आहेत, जे माझ्यासारखे बघतात, उत्तम वाचतात. पण बहुतांशी ऍक्टर्ससाठी ते शक्य होत नाही. पण ते व्हायला हवे असे माझे मत आहे. तुम्ही वाचायला हवे, पहायला हवे, हेच तुमचे वर्कशॉप आहे, हेच तुमचे फिल्ड आहे, असे आपण म्हणू.