शिस्तप्रिय, प्रगत देश – तैवान

माझा दुसरा विदेशप्रवास झाला तैवानला 2011 मध्ये झाला. तैवान हा देश एक बेट आहे. या देशातील नागरिक चीनमधून स्थलांतर करून तैवानमध्ये राहिले म्हणून देशाच्या नावापुढे रिपब्लिक ऑफ चायना असे लावतात. हा देश छोटा असला तरी त्या देशाने मोठी प्रगती केली आहे. मला माझ्या एका क्लाएंट सोबत पहिल्यांदा तैवानला जाण्याची संधी मिळाली. तैवान हा देश लहान असल्याने त्यांचा दूतावास नवी दिल्ली येथे आहे. मोठ्या देशांचे दूतावास भारतामध्ये दोन-चार ठिकाणी आहेत. अजून तैवानचा पर्यटक व्हिसा मिळत नाही आणि जर तुम्ही पहिल्यांदा या देशाला जाणार असाल तर दूतावासामध्ये जाऊन प्रत्यक्ष मुलाखत द्यावी लागते. मग ते व्हिसा देतात. तैवानच्या दिल्ली दूतावासामधून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून व्हिसा मिळविला व दिल्लीहून हाँगकाँगमार्गे तैवानला गेलो.

आम्ही तैपेई विमानतळावर पोहचलो. आम्हाला नेण्यासाठी कंपनीने कार पाठवली होती. माझ्या नावाचा बोर्ड घेऊन उभ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर आम्ही ताइच्युंगला निघालो. कारने तो प्रवास दोन तासाचा होता. संध्याकाळी हॉटेलमध्ये पोहचलो. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या माणसाबरोबर कंपनीत गेलो. कंपनीचा परिसर खूप मोठा होता. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा होता. कामावर असताना कोणीही कोणाशी बोलत नव्हता. त्यांचेकडे फक्त एकाच शिफ्टमध्ये काम चालते. शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी असते. आठवड्यातील पाच दिवस जीवापाड काम करून ते सुट्टी एंजॉय करतात.

तैवान हा देश लहान देश असूनही प्रगती वाखाणण्यासारखी आहे. तैवान हा देश 95 टक्के एक्सपोर्ट करतो व पाच टक्के शेतीव्यवसाय व इतर उद्योग चालतात. रस्ते खूप मोठे व प्रशस्त आहेत. तेथे फ्री वे आहेत. ज्यावर जागोजागी कॅमेरे आहेत की जे गाडीचा वेग, लेन यावर लक्ष ठेवतात. प्रत्येक गाडीत एक यूनिट असते की जे कॅमेरा आल्यावर एक किमी आधी सांगते. कॅमेरा जवळ गेल्यावर चालकाने त्या कॅमेऱ्याकडे बघितलेच पाहिजे नाहीतर दंड बसतो. हा दंड भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तो कुठेही भरता येतो. पार्किंग साठी शहरामध्ये व्यवस्था आहे. तुम्ही कुठेही असा, पार्किंगला जागा मिळणारच. फक्त थोडंसं चालावं लागतं. हे पार्किंगसुद्धा पे पार्किंग असतं. पार्किंगसाठी आखलेल्या पट्‌ट्यातच गाडी पार्क करावी लागते. नाहीतर दंड बसतो. हे पार्किंग चार्जेस येत्या चोवीस तासात भरायचे असतात. तेही तुम्ही कोणत्याही 7/11 शॉप मध्ये भरू शकता. जर दंड नाही भरल्यास गाडी मालकाच्या नावे घरी एक पत्र जाते व ते पार्किंगभाडे दंडव्याजासह भरावे लागते. पार्किंग चार्जेसची एक स्लीप गाडीच्या वायपरला लावली जाते. ती लावणाऱ्या माणसाला मी एकदाही पाहिले नाही. पण पार्किंग भाडे भरणारे लोक पाहिले. वाहतुकीची प्रचंड शिस्त, पार्किंगची शिस्त तैवानमध्ये पहावयास मिळाली. या सर्व वाहतुकीसाठी आखून दिलेली सिस्टीम ही वंदनीय आहे.

कंपनीमध्ये आम्ही मशीन इन्स्पेक्शन केले. संध्याकाळी आमच्या बरोबरचा कंपनीचा माणूस आम्हाला घेऊन बाहेर पडला. आम्हा तिघांनाही भारतीय जेवण खायचं होतं. म्हणून तो व्यक्ती आम्हाला एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. कॅफे बॉलीवूड असं रेस्टॉरंटचं नाव होतं. मेनू कार्ड बघितल्यावर बरं वाटलं. कारण ते आपल्यासारखंच होतं. पदार्थाची यादी ओळखीची वाटली. मात्र किंमत पाचपट सहापट अधिक होती. आम्हाला बिल द्यायचं नव्हतं. म्हणून आम्ही तो विचार केला नाही. आवडीचे पदार्थ मागवून घेतले. आम्ही तिघे त्या कॅफेत होतो म्हणून त्यांनी टीव्हीवर हिंदी चॅनल लावला. त्यावर हिंदी गाणी चालू होती. तिथे जेवताना असं वाटत होतं की भारतातच कुठेतरी जेवतो आहोत. आपण भारतात असतो त्यावेळी म्हणतो की आज मी गुजरातला निघालो आहे. वा तिथे आहे, असं वगैरे. पण तुम्ही ज्यावेळी देशाच्याच बाहेर असता त्यावेळी प्रत्येक ठिकाणी भारताची ओळख म्हणून काहीतरी अशा गोष्टी नजरेस पडतात. त्या कॅफेमध्ये भारताच्या प्रत्येक भागातील राज्यातील त्या त्या राज्याची व भारताची ओळख सांगणारी चित्रे, विविध वस्तू, वेटरचे ड्रेस अशा सांकेतिक खुणा दिसतात. कोणा जवळच्या भागात असल्याचं वाटत होतं. आम्ही पुढच्या दिवशी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. एक छोटंसं गाव शहरापासून एक तासाच्या अंतरावर होतं. त्या खेड्याचं नाव लुकांग असे होते. ते शहर तैवानचा पारंपरिक वारसा अजूनही जपून ठेवणारं आहे. लुकांगमध्ये बऱ्याच जुन्या इमारती पाहण्यास मिळाल्या. पण त्याही आधुनिकच वाटत होत्या. भले ते लहान शहर असलं तरीही रस्ते खूपच मोठे होते. वाहतुकीचे सर्व नियम सारखेच. जुने मंदिरे होती. बुद्धांची मंदिरे जास्त होती. मंदिरात वातावरण खूप शांत, प्रसन्न होतं. त्या मंदिरात सतत अगरबत्ती पेटवून ठेवण्यासाठी एक भांडं होतं. मंदिरात येणाऱ्या व्यक्तीने आपल्याबरोबर अगरबत्ती आणायच्या व त्या भांड्यात लावायच्या. प्रत्येकजण तसंच करायचा. त्यामुळे मंदिरात एक सुवासिक प्रसन्न वातावरण कायम होतं. मंदिरात जातानाही तिथे चप्पल, बूट घालतात. फक्त गाभाऱ्यात जाताना घालत नाहीत. मंदिरात जाताना व फिरताना बूट घालायची आमची ही पहिलीच वेळ. थोडं वेगळं वाटत होतं. पण आम्ही वेगळ्या देशात, तेथील संस्कृतीप्रमाणे तेथे फिरत होतो. नंतर आम्ही एका पार्क मध्ये डोंगरावर गेलो. तिथे भगवान बुद्धाची महाकाय मूर्ती होती आणि त्याच्या खाली मंदिर. मूर्ती लांबून पूर्ण पाहता यावी, म्हणून तिथे लोखंडी प्लॅटफॉर्म उभा केला होता. आम्ही ती मूर्ती पाहिली. काही फोटो काढले. पार्कमध्ये शांत बसलो. मग आम्ही परत हॉटेलकडे परतलो. नंतरच्या दिवशी आम्ही तैपेई 101 ही इमारत पाहण्याचं प्लॅनिंग केलं. तैपेई ही तैवानची राजधानी. त्या शहरात ही इमारत आहे. तसेच त्या इमारतीला 101 मजले आहेत. म्हणून त्या इमारतीचं नाव आहे- तैपेई 101. ही इमारत शहरातून कुठूनही दिसते. ही इमारत बांधून झाली त्यावेळी जगातली सर्वांत उंच इमारत म्हणून ओळखली जायची. हा विक्रम जवळपास दहा वर्षे या इमारतीकडे होता. आता जगातली सर्वांत उंच इमारत दुबईमध्ये आहे. बुर्ज खलिफा म्हणून. आणि तैपेई 101 ही ग्रीन बिल्डींग म्हणून नंबर एकवर आहे. ही इमारत इको फ्रेंडली आहे म्हणून तिला ग्रीन बिल्डींग म्हणतात. तैवान हे बेट आहे. त्यामुळे तिकडे चक्रीवादळे येतात. त्यातही ही इमारत इंचभरपण हालत नाही.

101 मजल्यांची उंच इमारत असून उंची 509 मीटर आहे. या इमारतीचे काम 1999 मध्ये सुरू करण्यात आले आणि 2004 मध्ये पुर्ण झाले. या इमारतीचे 101 मजले जमिनीपासून वर आहेत तर 5 मजले जमिनीखाली आहेत. या इमारतीमध्ये सांकेतिक चिन्हांचा जास्त वापर केला आहे की जे तैवानच्या संस्कृतीशी निगडीत आहेत. मुख्य टॉवर हा 8 मजल्यांचा आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या 7 इंद्रधनुषी रंगाने टॉवर उजळला जातो. तैपेई 101 ही इमारत अशा ठिकाणी आहे की जिथे भुकंप व चक्रीवादळ ही सर्वसामान्य गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी इमारतीला एक काऊंटर वेट दिले आहे. एक मोठा लोखंडी गोळा 89 व्या मजल्यावर आहे. त्याला ते मास डँपर म्हणतात. हा गोळा चक्रीवादळाच्या विरूद्ध दिशेला जाऊन इमारतीचा समतोल राखतो. तिथे लोक सांगतात की, चक्रीवादळ किंवा भुकंपामध्ये सर्वात सुरक्षित स्थान म्हणजे ही इमारतच आहे. खरं तर या इमारतीवर लिहिण्यास सुरूवात केली तर तिच्या गौरवाबद्दल एक ग्रंथच तयार होईल, इतकी आकर्षक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी ही इमारत आहे. तळमजल्यावरून 89 व्या मजल्यापर्यंत लिफ्ट फक्त 40 सेकंदामध्ये पोचते. तर एवढच अंतर उतरताना 44 सेकंद लागतात. लिफ्टमधून वर जाताना कान गच्च होतात, इतका प्रचंड वेग असतो. पण हा वेग त्यांच्यासाठी सुरक्षित असाच आहे. अशा अनेक अप्रतिम, विशेष गोष्टींनी परिपूर्ण अशी ही इमारत आहे. तैवान हा आपल्यातील एका राज्याएवढा देश पण त्यांची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. तैवान या देशाच्या भेटीने मला एक गोष्ट दिली ती म्हणजे जर प्रचंड इच्छाशक्ती असेल तर नियमित होणाऱ्या नैसर्गिक संकटावरही मानव विजय मिळवून त्याची तीव्रता कमी करू शकतो. म्हणजेच अशक्य असं काहीच नसतं. फक्त ते करायची, पूर्णत्वास नेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. एक चांगला विचार, कल्पना, कष्ट या जोरावर आपण काहीही करू शकतो.