उद्यमशीलतेचा देश- चीन

April 29, 2023 0 Comments

माझ्या लहानपणी कोणालाही वाटले नसेल की, हा मुलगा विदेशी जाऊन येईल. पण आतापर्यंत मी कामानिमित्त सहा देशांमध्ये जवळजवळ बारा वेळा जाऊन आलो आहे. मी उद्योगाबद्दलची काही पुस्तके वाचली. त्या उद्योजकांनी त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी काय केले याचे आकलन केले. बरेच उद्योग सुरूवातीला लहानच होते. पण ते आज एका वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहेत. काही उद्योजकांनी आपली सुरूवात वस्तू आयात करून केली. बाहेरच्या वस्तूंना भारतीय बाजारात मोठी मागणी असते. त्यातून नफा मिळतो. अशा वस्तूंना “इंम्पोर्टेड’ वस्तू असे म्हणतात. इंपोर्टेड म्हणजेच आयात केलेली. इंपोर्टेड या इंग्रजी क्रियापदाला विशेषणच म्हणून लोक वापरतात. मीही या विशेषणाचा बळी पडलो. भारतात एकसे एक चांगल्या वस्तू आहेत पण मागणी मात्र इंम्पोर्टेडला जास्त आहे. म्हणून मी माझ्या उद्योगवृत्तीच्या मनाने विचार करून ठरवलं की, “मागणी तसा पुरवठा’ या नियमाने आपणही काही वस्तू आयात करून छोटीशी सुरवात करायची. सगळ्या गोष्टींच्या शोधानंतर काही वस्तू निश्चित करून मी पहिल्यांदा चीनला जाण्याचा निर्णय घेतला. विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट लागतो. एवढं मला माहीत होतं. मग एक ट्रॅव्हल एजन्सी गाठली. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मी मुंबईला जाण्यासाठी निघालो. वाटेत बसमध्ये बिघाड झाल्याने बस थांबली. ड्रायव्हर दहा मिनिटांत दुरूस्त होईल म्हणत होता. परंतु एक तास झाला तरीही बस चालू झाली नाही. मग मी ती बस सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरी बस पकडून मुंबईला पोहचलो. किंगफिशरच्या काऊंटरला बोर्डींग पास घेऊन मी विमान गेटकडे जाण्यास निघालो. इमिग्रेशन करताना ऑफिसर मला बरेच प्रश्न विचारत होता. आपण कोठून आला, काय करण्यासाठी निघाला, इन्शुरन्स आहे काय, रिटर्न तिकीट आहे काय, विजा आहे काय? इत्यादी प्रश्नांची बरसातच. मी माझ्या पासपोर्टबरोबर सगळी कागदपत्रे त्याला दिली होती. तरीही तो असे प्रश्न विचारून मला गोंधळात टाकण्याचे काम करत होता. पण माझ्यासाठी ते ट्रेनिंग म्हणून महत्त्वाचं होतं. माझी फ्लाइट मुंबई-हाँगकाँग अशी होती. माझ्याकडे चीनचा विजा होता. पण हाँगकाँगमध्ये ऑन अरायव्हल व्हिसा भारतीयांना मिळतो. तोही फुकट, पण ते या फुकट विजासाठी मुलाखत घेतात. तेही तिथे पोहचल्यावर. हे मला माहित नव्हतं. पहिल्यांदा हाँगकाँगला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मुलाखत घेतली जायची. पण जर तुम्ही दुसऱ्यांदा हाँगकाँगला गेला तर मुलाखत नसते. आपण एखाद्या दुसऱ्या देशात जात असताना त्या देशाची परवानगी काढावी लागते. यालाच विजा म्हणतात. अशी ही परवानगी नाकारण्याचा पूर्ण अधिकार त्या देशाला असतो. ही परवानगी नाकारताना त्यांना कोणतेही कारण द्यावे लागत नाही. कोणतेही कारण दाखवून ते विजा नाकारू शकतात. अशा प्रकारची चर्चा विमान गेटवर बसलो असताना सहप्रवाशाबरोबर चालली होती. जे आपल्याला माहित नाही त्याची माहिती मिळवणे व त्याचा वापर करणे हे महत्त्वाचे असते. मी ही तेच केले.

आमचं विमान मुंबईहून हाँगकाँगला जाण्यासाठी निघालं. मुंबई-हाँगकाँग हे अंतर सुमारे 4300 किमी आहे. त्यासाठी सुमारे सहा तास वेळ लागतो. अशा प्रकारच्या सूचना पायलटने प्रवाशांना दिल्या. बाकीच्या प्रवासात आपण काय करू शकता व काही करू शकत नाही, इत्यादी माहिती देण्यात आली. सकाळी हाँगकाँग विमानतळावर उतरल्यावर परदेशी जमिनीवर पाय ठेवल्याचा आनंद झाला. नील आर्मस्ट्रॉंगला चंद्रावर पाऊल ठेवल्यावर जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद मला झाला. पण हा फार काळ टिकला नाही. कारण इमिग्रेशन अधिकाऱ्याने मला ओळीतून बाजूला उभे केले. तसं माझं हृदय धडधडू लागलं. मुंबईमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी विसरलो नव्हतो. माझ्याबरोबर इतर काही लोकांना बाजूला काढल्यावर मला धीर मिळाला आणि त्यातही मराठी बोलणाऱ्या दोन मुलांना माझ्याच बाजूला उभं केल्यामुळे मला थोडं बरं वाटलं. अशा तीस जणांना मुलाखतीसाठी वेगळ्या रूममध्ये नेले. तिथे मुलाखती सुरू झाल्या. त्यांनी प्रत्येकाची सर्व कागदपत्रे तपासण्यास सुरूवात केली. माझी वेळ आली तेव्हा मला विचारण्यात आलं- आपण काय करण्यासाठी आला, काय काम आहे, वगैरे. पण तो अधिकारी इतक्या फास्ट इंग्रजी बोलत होता की ते सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं. मला माझ्या पहिल्या ट्रिपला जास्त इंग्रजी बोलता येत नव्हतं. मी माझ्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो. त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. समोरच्या माणसाचं समाधान होईल व त्याची मर्जी आपल्यावर येईल हे कसं करायचं याचं तंत्र मला अवगत होतं. मुलाखत झाल्यावर त्यांनी मला हाँगकाँगचा चौदा दिवसांचा विजा दिला. माझ्यासाठी तो पुरेसा होता. खूप वेळ थांबावं लागल्याने मला भूक लागली होती. म्हणून मी खिशातीली च्युईंगम तोंडात टाकून एअरपोर्टच्या बाहेर पडू लागलो. हाँगकाँग एअरपोर्ट हा समुद्रात भर टाकून बांधलेला एअरपोर्ट आहे. तो इतका मोठा आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एअरपोर्ट ट्रेनने प्रवास करावा लागतो. ट्रेनमधून उतरल्यावर मी तोंडातलं च्युईंगम डस्टबिन मध्ये टाकलं. तेवढंच एका पोलिसाने पाहिलं व मला अडवलं. विचारलं, “आपण डस्टबिनमध्ये काय टाकलं?’ माझी विदेशी जाण्याची ही पहिलीच वेळ, पण मी विदेशात असल्यानेच ते च्युईंगम डस्टबिनमध्ये टाकलं होतं. आपल्याकडे आपण काय करतो याची मला जाणीव होती. म्हणूनच मी ते डस्टबिनमध्ये टाकलं. तरीही त्या पोलिसाला अडचण होती. चर्चेनंतर असं कळालं की ते मी कागदामध्ये गुंडाळून मग डस्टबिनमध्ये टाकणं गरजेचं होतं. मीपण ट्राफिक पोलिसाप्रमाणेच त्याच्याबरोबर दंड कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या तो ऐकेनाच. म्हणून मग मी हाँगकाँग डॉलर 100 दंड दिला. त्याप्रमाणे एका च्युईंगमला डस्टबिनमध्ये कागदात न गुंडाळता टाकल्याने 700 रूपयांचा दंड मी भरला होता.

माझं बजेट थोडं कमी असल्याने मी हाँगकाँगवरून चीनला बसने जाणार होतो. विमानतळाच्या बाहेर येऊन मी चीनला जाण्यासाठी बस शोधू लागलो. एका काऊंटरवर तिकीट घेऊन मी लाईनला उभा राहिलो. बसमध्ये विंडोसीटला जाऊन बसलो. बस सुरू झाली. एकेक गगनचुंबी इमारती पाहून मला आश्चर्य वाटलं. मुंबईमध्येही गगनचुंबी इमारती आहेत. पण त्या मोजक्याच. त्याच्या कितीतरीपट जास्त इमारतींचं जाळंच पहायला मिळालं. हाँगकाँग हा समुद्राच्या काठाचा देश. समुद्रावरून जाणारा मोठाच्या मोठा रस्ता खूप लांब होता. त्या रस्त्यावरून जाताना बाजूला लहान लहान जहाजे दिसत होती. तोच रस्ता पुढे बोगद्याला जाऊन मिळाला. बोगदा आता संपेल, मग संपेल असं वाटत होतं पण बोगदा काय संपत नव्हता. बोगद्याच्या आत दिवसा जसा सूर्यप्रकाश असतो तसा प्रकाश होता. आपल्याकडे सर्वांत मोठ्या बोगद्यातही नवीन असताना लाईटस्‌लावल्या जातात. नंतर त्या चालतात की बंद पडतात याकडे कोणाचेही लक्ष नसते. मी एका तासाच्या बस प्रवासानंतर चीनच्या सीमेवर पोहचलो. परत इमिग्रेशन करून चीनमध्ये दाखल झालो. मला नेण्यासाठी येणारे कंपनीचे अधिकारी माझी वाट पाहून परत गेले होते. मी तेथून त्यांना फोन करून सांगितले की मला यायला हाँगकाँग विमानतळावर जास्त वेळ गेला. मग ते मला नेण्यासाठी परत सीमेवर यायला निघाले. मीही वाट बघत बाजूला उभा राहिलो.

तिथे बरेच लोक इमिग्रेशन करून बाहेर पडत होते. सगळे लोक माझ्यापेक्षा वेगळे दिसत होते. चीनचे लोक आपल्यापेक्षा वेगळे दिसतात. त्यांच्याकडील वातावरणानुसार त्यांची जडणघडण झालेली असते. ते शुभ्र गोरे असतात. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आपल्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. मी वाट बघत एकाच ठिकाणी उभा होतो. तेवढ्यात भारतीयासारखा दिसणारा एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलू लागला. बोलल्यानंतर असे कळाले की, त्याचे पालक भारतीय आहेत. पण तो कधी भारतात गेला नाही. मॉरिशस देशाचा तो नागरिक होता. एवढ्यात मला नेण्यास कंपनीची गाडी आली. माझ्याजवळ एक चिनी मुलगी येऊन मला घेऊन पार्किंग एरियाकडे चालू लागली. वॉकिंग फ्लाय ओव्हर (पुलावर) चालताना पहिला अनुभव हा की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं नाही. हाँगकाँग मध्येही ब्रिटीश राजवट होती, त्यामुळे तिथे नियम रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे, गाडी चालवणे असा होता. चीनमध्ये मात्र डाव्या बाजूने न चालता उजव्या बाजूने चालावे लागते.

मी गाडीत बसलो. गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायला लागली. मागे बसल्याने इतकं काही वाटत नव्हतं. पण सिग्नलवरून तो उजव्या बाजूला वळला की, वाटायचं तो नो एंट्री मध्ये वळत आहे. मी शेनझेन या शहराकडे निघालो होतो. शहरातील रस्ते खूप मोठे होते. गाडी शिस्तबद्ध पद्धतीने लेनमध्ये चालत होती. दोन तासाच्या प्रवासानंतर त्यांनी मला युथ हॉस्टेलला आणून सोडलं. युथ हॉस्टेल हे राहण्यासाठी असतं. त्यांची ऑफिसेस जगभर आहेत. भारतात त्यांचे मुख्य कार्यालय दिल्लीला आहे. त्यांच्या शाखा भारतभर आहेत. जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर युथ होस्टेल ही एक कमीत कमी बजेटमध्ये चांगली राहण्याची सोय आहे. मीही तीच पहिल्या विदेश दौऱ्यासाठी निवडली होती. युथ होस्टेलची शाखा कोल्हापूरमध्येही आहे. पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. कोल्हापूरच्या दरात मला चीनमध्ये राहण्याची सोय झाली होती. सगळं बजेटमध्येच करण्याचं ध्येय होतं. मी आवरून परत गाडीत बसलो व कंपनी भेटीसाठी गेलो. कंपनीच्या ऑफिसमध्ये चहा, कॉफी काय घेणार असं विचारल्यावर नेहमी चहा पिणारा मी, परदेशात असल्याने कॉफी सांगितली. कॉफी पिण्यास सुरवात केल्यावर कळालं की, त्यात दूध तर नाहीच पण दुधाची पावडर पण टाकलेली नाही. तशीच कडू कॉफी मी जबरदस्तीने प्यायलो. नंतर कंपनीचे शोरूम पाहिले. सगळ्या अद्ययावत वस्तू शोरूममध्ये होत्या. त्यानंतर आम्ही जेवायला जाण्याचा प्लान केला. माझ्याबरोबर एक महिला अधिकारी व मॅनेजर जेवण्यासाठी आले. मी त्यांना सांगितले की, मी शाकाहारी आहे. त्यांनी विचारलं की, हा काय प्रकार असतो? मग त्यांना शाकाहार म्हणजे काय हे उदाहरणासहित व पदार्थासहित समजावून सांगितले. मग हॉटेल शोधण्यासाठी थोडा त्रास झाला. त्यांच्याकडेही बौद्ध धर्म आहे, की जो फक्त शाकाहार करतो. पण तो उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. असं शाकाहारी हॉटेल शोधणं म्हणजे त्यांच्यासाठी दिव्यच. फ्राय केलेला भात व काही पालेभाज्या माझ्यासमोर ठेवल्या. बाकीच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीचं जेवण मागवलं. मी चमचा मागवला तर मला सूप प्यायचा चमचा आणून दिला. त्यान भात खाणं शक्य नव्हतं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी चॉपस्टिक आणून दिल्या. त्या चॉपस्टिकने (दोन काट्यांनी) भात खाणे अशक्य. मग हातानेच भात खाण्यास सुरवात केली. पण त्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्यावर मला ओशाळल्यासारखे वाटले. ते सर्वजण तोच भात चॉपस्टिकने अगदी व्यवस्थित खात होते. मीही चॉपस्टिक घेऊन भात खाण्याचा प्रयत्न केला. पण जमत नव्हतं. हार मानायची नाही. समोरील व्यक्तींना येतंय, मग आपल्याला का नाही? म्हणून प्रयत्न चालू केला. थोडंसं मार्गदर्शन चिनी लोकांकडून घेतलं. त्यांनीही लगेच सगळं सांगितलं. चॉपस्टिक कशा पकडायच्या, कसं उचलायचं व कसं तोंडात टाकायचं. मी ठरवलं की सगळा भात असाच खायचा. आणि अथक परिश्रमानंतर तो खाल्लाही. हात दुखत होते. पण पोट भरलं नव्हतं. दुसरा इलाज नव्हता.

मी त्या कंपनीत परत गेलो. सर्व प्रकारची प्रॉडक्ट इन्फो घेतली. तो प्रॉडक्ट म्हणजेच एलईडी स्क्रिन्स की ज्या आता सगळीकडे लावलेल्या असतात. आपल्या कोल्हापूरात या स्क्रिन्स आता अलीकडे 2014 च्या शेवटी शेवटी लावल्या आहेत. पण त्याचा अभ्यास करण्यासाठी मी फार पूर्वी म्हणजे जाने. 2010 मध्ये गेलो होतो. सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. बजेट घेतलं. पण यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागत होती. हे प्रोडक्ट विकायचं, जसं मी इंपोर्टेड विकतो तसं. पण मला त्यावेळी कोणीही गुंतवणूकदार कोल्हापुरात मिळाला नाही ना बाहेर कोणी मिळाला. पण मी प्रामाणिक प्रयत्न करतच राहिलो. हताश न होता, लोकांना भेटतच राहिलो. दुसऱ्या दिवशी मी कंपनीत जाऊन प्रॉडक्ट ट्रेनिंग घेतलं. संध्याकाळी चार वाजता कंपनीच्या डायरेक्टरबरोबर मीटिंग होती. मीटिंग सुरू झाल्यावर कळालं की, डायरेक्टर फक्त चिनी भाषेतच बोलतो. इंग्रजी येत असूनसुद्धा बोलत नाही. दोघांमधल्या संभाषणासाठी दुभाषी मुलगी भाषांतर करत होती. मी इंग्रजीमध्ये बोलत होतो. ती माझ्या बोलण्याचा चीनी भाषेत अनुवाद करत होती. मी काही बोलल्यावर डायरेक्टरच्या चेहऱ्यावर तसूभरही फरक पडत नव्हता. पण चिनी भाषेत अनुवाद ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायचे. मला वाटलं की खरंच त्याला इंग्रजी येत नसेल. पण नंतर नंतर तो माझ्या बोलण्यावर लगेच रिऍक्ट करायचा म्हणजेच त्याला मी काय बोलत होतो ते समजत होतं पण तो मध्ये अनुवादक घेऊनच माझ्याशी बोलत होता. तसेच त्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्या दोघांना जे काही बोलायचं होतं ते चिनी भाषेतच ते बोलत, त्यामुळे ते मला समजणार नव्हतं.

मी विचार केला की आपण मराठी येणाऱ्याबरोबरही हिंदी भाषेत बोलण्यास सुरूवात करतो. तसेच एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये/मॉलमध्ये हटकून इंग्रजी बोलतो. पण आपल्या मातृभाषेला प्राधान्य देत नाही. जर समोरच्याला मराठी येतच नाही, त्यावेळी इतर भाषेत संवाद साधून कार्य सिद्धीस नेण्यास हरकत नाही. पण मराठी येणाऱ्यांबरोबर मराठीतच बोलले गेले पाहिजे. याच डायरेक्टरबरोबर मी संध्याकाळी जेवणासाठी गेलो. त्यावेळी तो माझ्याबरोबर इंग्रजीमध्येच बोलला. पण त्यात एकही आमच्या कामाच्या संबंधित नव्हते. इंटरनॅशनल सेल्स ऑफिसर व्यतिरिक्त इंग्लिश शक्यतो कोणीही बोलत नाही. बाकीच्यांना येत असले तरीही कामाशिवाय ते बोलत नाहीत. आपल्या देशावर ब्रिटीश राजवट होती. म्हणून बऱ्याच रोजच्या व्यवहारात इंग्रजी शब्द घुसले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यायचं असेल तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी इंग्रजी ही भाषा अवगत केली. चीनच्या उत्पादनातील अर्ध्याहून अधिक माल बाहेरच्या देशांत विकला जातो. इलेक्ट्रॉनिक्समधील आताची कोणतीही वस्तू घ्या वा तिचे सुटे भाग किंवा पूर्ण वस्तू ही चीनमधीलच असते. चीनच्या लोकांमध्ये एक वेगळीच काम करण्याची चिकाटी आहे. ते अविरत काम करतात. उत्तर चीनमधून दक्षिण चीनमध्ये आलेले बरेचसे लोक होस्टेलवर राहतात. माझ्याबरोबर जी दुभाषी मुलगी होती, तिचे लग्न झालेले होते पण ती तिच्या कंपनीच्या होस्टेलमध्ये राहत होती. तिचा नवरा त्याच्या कंपनीत होस्टेलमध्ये राहत होता. मग मी तिला विचारलं की, तुम्ही दोघे एकमेकांना भेटता कधी? तर तिने सांगितले रविवारी. ते दोघे रविवारी भेटतात व त्यादिवशी ते हॉटेलमध्ये राहतात. परत नवीन आठवड्याला दोघांचं रूटीन वेगळं. चीनमध्ये स्त्री-पुरूष हा भेदभाव कामात अजिबात नाही. कामासाठी ते सारखेच आहेत. स्त्रिया-मुली सगळी कामं करतात. कामाव्यतिरिक्त त्यांना काही दिसत नाही. फक्त काम आणि कामच. त्यांना मी विचारलं की, लोकशाही प्रकाराबद्दल तुमचे काय मत आहे? त्यांनी सांगितलं की, चीनमध्येही अंशतः लोकशाही आहे. आम्ही आम्हाला काय करायचं ते करू शकतो. आम्हालाही सगळं काही वैयक्तिकरीत्या करता येतं. फक्त सरकारी धोरण, सरकार विरोधात बोलण्याचं धाडस कुणी करत नाही. ना त्याकडे बघण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. सरकार विरोधात बोलण्याव्यतिरिक्त ते सर्व काही करतात. त्याला ते अंशतः लोकशाही मानतात.

चीनचे लोक कायम कामामध्ये व्यस्त असतात. चिनी नववर्षाला ते मोठी सुट्टी घेतात व आपल्या घरी जातात. तरूण मुला-मुलींचे आपापले मित्र असतात. त्यांच्याबरोबर रविवार घालवायचे. पण एकमेकांबरोबर जर पटले नाही तर ब्रेकअप. या पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा त्यांच्यावर पडलेला आहे. शहरात कोणतीही मुलगी वा स्त्री चीनचा पारंपरिक वेष परिधान केलेली दिसली नाही. कमीत कमी कपड्याचा वापर. सिग्नलला तिकडेही भिकारी दिसतोच. पण शहरात भिकाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. चीनमध्ये उद्योगांना बऱ्याच सवलती आहेत. म्हणूनच जगभरातील नावाजलेले ब्रॅंड चीनमध्ये आपला कारखाना सुरू करताना दिसतात.

तिसऱ्या दिवशी सकाळी मला गाडी नेण्यासाठी आली. पण आज लेडी ड्रायव्हर होती. मी अनुवादक मुलीबरोबर बोलता बोलता विचारलं की, तुमच्याकडे ड्रायव्हर म्हणून स्त्रियाही काम करतात का? त्यावेळी तिने सांगितले की, या आमच्या डायरेक्टर सरांच्या पत्नी आहेत. आज कंपनीमध्ये ड्रायव्हरला दुसरे काम असल्याने त्या स्वतः गाडी चालवत आल्या आहेत. मी विचार केला की, मी कोणी फार मोठा माणूस नाही तरीही ते लोक मला व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते. त्यावेळी मी एका कंपनीत मशीन विकण्यासाठी विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. ही गोष्ट त्यांना माहीत असूनही त्यांनी फ्युचर प्लॅनसाठी म्हणून माझा योग्य सन्मान केला. त्यात कोणताही भेदभाव नव्हता. मला हे पाहून आश्चर्य वाटले. मी दिवसभर ट्रेनिंग घेतल्यावर मला निरोप देताना त्यांनी भेट म्हणून एक टाय, कंपनी कीचैन तसेच माझा अनुवादक तसेच कंपनी डायरेक्टरबरोबरचा एक फोटो काढून फ्रेम करून दिला. माझी परत जाण्याची सर्व सोय त्यांनी केली होती. माझा पिक-अप तसेच ड्रॉप माझ्या फ्लाईट टाईम प्रमाणे ठरवून मग मला कंपनीतून शॉपिंग सेंटरला नेले. तिथे मी घरच्या काही लोकांसाठी वस्तू खरेदी केल्या. मग जेवून मी त्यांचा निरोप घेतला.

खरंच त्यावेळी मला वाटलं देखील नाही की मी परदेशात आहे. भाषा वेगळी होती. चेहरे वेगळे होते. जागा वेगळी होती. देश वेगळा होता. पण आपुलकी, माणुसकी मात्र तीच होती. आपलेपणाचा भाव प्रकर्षाने जाणवत होता. व्यवसायामध्ये प्रत्येकजण आपल्या व्यवसायाला सातासमुद्रापार पोहचवण्यासाठी प्रयत्न तर करतोच. पण माणुसकीने, आपुलकीने जोडलेली नाती तुम्ही जगात कोठेही असला तरीही बरोबर असतात. त्याच पद्धतीने त्या कंपनीला जरी भविष्यात माझ्याकडून काही व्यवसाय मिळण्याची अपेक्षा असणं चुकीचं नाही. त्यांचा व्यवसाय अप्रत्यक्षरीत्या माझ्याबरोबर भारतात सुरू होणार, तो किती मोठा असेल, होईल की नाही, नाहीच झाला तर अशा एकाही प्रश्नास जागा न ठेवता त्यांनी मला मार्गदर्शन केले. योग्य प्रशिक्षणपर माहिती दिली. आदरातिथ्य केलं. पण यात परत काही मिळावं अशी अपेक्षाही त्या कंपनीच्या लोकांत दिसली नाही. हे महत्त्वाचं!

माझी ही पहिली व्यावसायिक सहल की जी मी पैसे खर्च करून, योग्य त्या बजेटमध्ये केली होती. त्यासाठी आर्थिक सहकार्यही काही लोकांकडून घेतले होते. तसेच आलेल्या सर्व अनुभवांमुळे ही व्यावसायिक सहल माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.

Leave A Comment

To Top
×