माझी सिंगापूरची सफर

April 29, 2023 0 Comments

माझ्या व्यवसायानिमित्त मी अनेक देशात फिरून आलो. तेथील औद्योगिक, तांत्रिक प्रगती विकास, लोकजीवन, संस्कृती यांचे मला दर्शन घडले. सिंगापूर सफरीतील माझे अनुभव आपणांसमोर मांडीत आहे.

मलाया द्विपसमूहाच्या दक्षिणेस असलेल्या एका लहान बेटावर सिंगापूर हे शहर वसलेले आहे. आपल्या देशातलि पुणे शहराच्या महापालिका हद्दीएवढा याचा विस्तार आहे. सिंगापूरचे क्षेत्रफळ 716 चौ.कि.मी. इतके आहे. मी पुण्यात व सिंगापूरमध्ये तुलना करीत नाही, पण हा एवढा छोटा देश असूनही या देशाची प्रगती वाखाणण्यासारखी आहे. या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, या देशात एकही झोपडी पाहायला मिळणार नाही. सिंगापूरमध्ये सर्व धर्मांचे लोक राहतात. तरीही सगळ्यात जास्त चिनी लोक इथे राहतात. इतर देशांतून स्थलांतरित झालेले लोकही येथे राहतात.

सिंगापूरला जाण्यासाठी शक्यतो सिंगापूर एअरलाइन्सचा वापर करावा लागतो. कारण ते थोडे स्वस्त पडते. मी इतरही विमानाने प्रवास केला आहे, परंतू सिंगापूर एअरलाईन्सची गोष्टच निराळी ! ही इतरांपेक्षा आधुनिक अशी असतात तसेच त्यात मिळणारी सेवा अप्रतिम असते. आपल्यात जसे जावयाचे स्वागत करतात, त्याहीपेक्षा उच्च प्रतीचे स्वागत, आदरातिथ्य ते प्रत्येकाचेच करतात. विमानातील हवाई सुंदरींनी

सिंगापूरचा पारंपारिक वेष परिधान केलेला असतो. त्या नेहमी हसतमुख, प्रसन्न व सेवेस तत्पर असतात. त्यांची भाषा ही अत्यंत सौम्य पण परिणामकारक असते. त्यांना काहीही विचारा, उत्तर सकारात्मकच मिळणार. त्यांचे बोलणे अतिशय प्रेमळ असते. सिंगापूर एअरलाईन्सने जगात सर्वप्रथम एअरबस 380 विमान खरेदी केलेले आहे. हे अत्याधुनिक विमान खरेदी करण्याचा मान सिंगापूर एअरलाइन्सला जातो. हे विमान डबल डेकर आहे. त्याची क्षमता सुमारे आठशे प्रवासी वाहून नेण्याची आहे आणि सुमारे पंधरा हजार कि.मी.चा प्रवास सलग करू शकते. 2007 पासून हे विमान सेवेत आहे.

सिंगापूर विमानतळ खूप विशाल आहे. त्यात दोन टर्मिनल आहेत. एका टर्मिनलहून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी लहान रेल्वे (मोनो रेल) आहे. विमानतळावर काम करणाऱ्यांमध्ये बरेचसे लोक बाहेरच्या देशातील आहेत. जे मूळ सिंगापूरचे आहेत त्यापैकी बरेचजण आपल्याकडील रिटायरमेंट लिमिटच्या बाहेर गेलेले आहेत. त्यांच्याकडे युवावर्ग कमी आहे. बऱ्यापैकी लोक बाहेरून कामासाठी आलेले असतात. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मला सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सी ड्रायव्हर भेटला. रांगेमध्ये उभे राहून जी समोर येईल, त्या टॅक्सीमध्ये बसायचे व जायचे, हा तिथला नियम. आम्हाला मिळालेली टॅक्सी भारतीय वंशाच्या पण भारतात कधीही न आलेल्या सिंगापूरच्या नागरिकाची होती. मी ऐकले होते की, सिंगापूरचे टॅक्सी ड्रायव्हर खूप व्यावसायिक असतात.

बोलता बोलता त्या ड्रायव्हरने निर्भया प्रकरणाची चर्चा सुरू केली. त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया मी ऐकत होतो. मन खूप बैचेन झाले होते. नेमके काय बोलावे, हे सुचत नव्हते. कारण आपण आपल्या देशात राहतो त्यावेळी चर्चा होते की, अमुक एका ठिकाणी असं असं झालं, खूप वाईट झालं वगैरे. त्याचा निषेधही आपण करतो. पण देशाच्या बाहेर काय करणार ? काय उत्तरे देणार ? कारण त्यावेळी आपण देशाचा प्रतिनिधी म्हणून सदरच्या विषयावर बोलत असतो. आपण जे बोलतो, तेच भारताचा एक नागरिक म्हणून परदेशात त्याची चर्चा होणार असते. आपल्या एका चुकीच्या माहितीमुळे देशाच्या प्रतिष्ठेवर गदा येऊ शकते. थोडा वेळ शांत राहून मी म्हणालो, “”झालेली गोष्ट निंदनीय आहे. असे होणे अपेक्षित नव्हते. पण काही वाईट लोकांच्या प्रवृत्तीबद्दल प्रतिक्रिया देणे, खूप कठिण आहे. सदर प्रकाराचा निषेध पूर्ण देशाने केलेला आहे. सदरच्या आरोपींना शिक्षा देण्यास भारतीय कायदा सक्षम आहे. आता परत असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सरकारी व सामाजिक पातळीवर दक्षता घेतली जात आहे. त्याने त्यांच्या देशात अशा प्रकारच्या घटनेत महिलाविषयक कायदा किती कडक आहे, हे सांगितले. तसेच असे प्रकार होऊ नयेत, म्हणून त्यांच्याकडची यंत्रणा कशी असते, हेही सांगितले.

सिंगापूर या देशाना आभाळाएवढी प्रगती केली आहे. त्यांनी त्यांच्या देशात “मॅन्युफॅक्चरींग’ ऐवजी “ट्रेडिंग’ वर जोर दिला आहे. त्यांनी त्यांची बंदरे विकसित केली आहेत. एका देशातून येणारा माल दुसऱ्या देशात जाण्याआधी सिंगापूरमधील कंपनीच्या गोडाउनमध्ये ठेवतात. मग जशी मागणी येईल, तसा पुरवठा केला जातो. बऱ्याच मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोडाउन्स तसेच ऑफिसेस सिंगापूरला आहेत. या सर्वांसाठी सिंगापूर सरकारचे टॅक्स धोरण चांगले आहे, म्हणून सदरची व्यवसायवृद्धी इथे झाली. टॅक्स धोरणाबरोबरच दळणवळणही प्रगत आहे. रस्ते खूप मोठे, प्रशस्त आहेत. जगातील प्रत्येक मोठ्या शहराशी संपर्क साधण्यासाठी विमानसेवा आहे. देशात आधुनिक मेट्रोट्रेनही आहेत. पर्यटकांसाठी बरीच आकर्षक स्थळे आहेत. तिथे खास असे रोप वे, राईड वे मिळते. जवळपास शहराच्या बहुतांश भागात ही रोप वे रायडिंगने आपण प्रवास करू शकतो.

मी माझ्या कामासाठी क्लार्क क्वे या ठिकाणाला जाण्यासाठी हॉटेलवरून टॅक्सीने निघालो. मी ड्रायव्हरला इमारतीचे नाव सांगितले होते. पण सदरच्या ठिकाणावरील ती इमारत त्याला सापडत नव्हती. म्हणून त्याने मला थोडे जास्त फिरवले; पण टॅक्सी बिल घेताना त्याने मीटरप्रमाणे पैसे घेतले नाहीत. तो मला म्हणाला, “मला सदरची इमारत माहित नव्हती, ही माझी चूक आहे. त्यामुळे आपल्याला थोडं जास्त फिरावं लागलं. तर जास्त फिरण्याने वाढलेलं भाडेही तुम्ही मला देऊ नका !’ असं वाक्य आयुष्यात एकदाही आपल्याला भारतात ऐकायला मिळणार नाही.

सिंगापूरचे लोक चांगल्या प्रकारचे इंग्रजी बोलतात. त्यांच्याही देशावर ब्रिटीशांचे राज्य होते. इंग्रजी तिथे प्राथमिक शाळेतच शिकवतात. सिंगापूरमध्ये जवळपास चीनसारखेच सण साजरे केले जातात. सिंगापूरमध्ये तमीळ भाषाही मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सिंगापूरमध्ये एका भागाचे नाव आहे, ‘‘लिटिल इंडिया.’’ सदरच्या विभागामध्ये गेल्यावर आपण भारतातच फिरत आहोत, असा भास होतो. रस्त्यावर लावलेले स्टॉल्स असो, वा पानपट्टी असो, एखादे हॉटेल असो, सगळे कसे भारतीय स्टाईलचे दिसते. हॉटेलमध्ये मेनू पूर्ण भारतीयच असतात. रस्त्याच्या बाजूची घरेही भारतीय पद्धतीची दिसतात. बाजारामध्ये सगळ्या भारतीय वस्तूंची मांडणी भारतीय पद्धतीनेच असते. वस्तूंच्या किंमती फक्त सिंगापूरच्या असतात. लिटिल इंडियामध्ये फिरताना एकदाही असं वाटत नाही की, आपण परदेशात आहोत. बाजारातील बार्गेनिंगची पद्धतही भारतीय असते. एखाद्या वस्तूची किंमत दुप्पट सांगून मग निम्मी कमी करून वस्तू विकायची. या भागात दक्षिण भारतीय लोक जास्त राहतात. जे पूर्वी ब्रिटीश राज्य असताना सिंगापूरला कामासाठी गेले होते, ते आज सिंगापूरचे नागरिक आहेत. त्यांचे मूळ “भारतीय’ असते. त्यांच्याकडे इतर लोक भारतीय म्हणूनच पाहतात. सिंगापूर हा देश अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. पाणी वाया घालविणे, रस्त्यावर कचरा टाकणे, यांसारख्या वर्तनाला तेथे दंड केला जातो.

Leave A Comment

To Top
×