मध्ययुगीन महाराष्ट्राचा वैभवशाली, गौरवशाली, ज्वलंत, प्रेरणादायी, समृद्ध इतिहास हा मोडी लिपीत आहे. हीच मोडी लिपी मध्ययुगीन काळात राजकारभाराची लिपी होती. पण मागील सहा–सात दशकापूर्वी काही कारणांमूळे मोडी लिपी कालबाह्य झाली, तत्कालिन मुद्रण तंत्रज्ञानाला मर्यादा होत्या, पण आज २१व्या शतकात मुद्रण तंत्रज्ञानात खुप मोठी क्रांती झाली आहे. आज मोडी लिपीचे बरेच फाँट तयार झाले आहेत,त्याद्वारे आपण सर्वकाही संगणकावर टंकीत करू शकतो.
मोडी लिपीचा ठेवा हा मराठी भाषेचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे, आज कोट्यावधी कागदपत्रे, दस्तऐवज मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. आज भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरीयाणा, ओरिसा व आसाम या राज्यात उपलब्ध आहेत याचबरोबर इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड, पोर्तुगाल, डेन्मार्क, इटली, स्पेन, इंडोनेशीया, जावा सुमात्रा बेटे या देशात उपलब्ध आहेत.
मोडी लिपीचा वापर यादवकाळापसून राज्यकारभार व प्रशासकीय लेखनात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. शिवकाळात, पेशवेकाळात या मोडीलिपीला बहर आला. इंग्रजी राजवटीत मोडी प्रचलीत होती. इ.स. १९६० पर्यंत मोडीचा वापर महाराष्ट्रात झालेला आढळतो. १९६० नंतर ही लिपी कालबाह्य झाली असली तरी आज ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेवून संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
मोडी लिपी ही मराठीची शिघ्र लिपी होती. मोडीचा वापर हस्तलिखीतासाठी होत असे. मोडीचा वापर मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत भाषा लिहिण्यासाठी झालेला आढळतो. आज जसे देवनागरी लिपीचा वापर मराठी, कोकणी, हिंदी, संस्कृत, नेपाळी इ. भाषा लिहिण्यासाठी होतो, तसाच मोडीचा वापर होत असे. मोडी लिपीने गेली ७००–८०० वर्षे आपले अस्तित्व अबाधीत ठेवले होते, पण १९६० नंतर मुद्रणकला तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल, आणी काही राजकीय बदल मोडीला कालबाह्य करण्यास कारणीभुत ठरले असावे असे मोडी तज्ञ व इतिहासकारांचे मत आहे.
आज कोणाही तरुणाला मोडी विषयी विचारलेस उत्तर येतेकी माझ्या आजोबांना मोडी येत होती. मग त्यानतंरच्या पिढीला मोडीचा गंधही लागला नाही. आणि हीच परीस्तिथी राहिली तर पुढील पिढीला सांगणारे आजोबापण राहणार नाहीत. आजही सहस्त्रावधी मोडी दस्तऐवजांचे वाचन होणे बाकी आहे, या दस्तऐवजामध्ये दडलेला इतिहास अज्ञात आहे, हेच कागद अजुन किती दिवस तसेच राहतील याची खात्री देता येत नाही. कारण आज मितीला त्यांची काळजी योग्य पद्धतीने न घेतलेमूळे लाखो कागद नष्ट होत आहेत. याची खबरदारी आत्ताच घेतली पाहीजे, नाहीतर पुढील पिढीला आपण काय वारसा देणार ?
मोडी लिपीला परत पूर्वीचे वैभव प्राप्त होईल का ते काळच ठरवेल. नक्की मोडी दस्तऐवजामध्ये काय दडले आहे यासाठी जास्तीतजास्त वाचक, अभ्यासक तयार करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच मोडी लिपीचा ऐतिहासीक अनमोल ठेवा पुढील पिढीला देता येईल. अन्यथा पुढील पिढी आजच्या पिढीला काय म्हणेल ? ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी वैभवशाली, गौरवशाली, ज्वलंत, प्रेरणादायी, समृद्ध इतिहासाचा अनमोल वारसा, ठेवा दिला आहे तो आपण आपल्या पुढील पिढीला देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी समजुन कार्य तडीस नेणे गरजेचे आहे.
मोडी लिपीचा वापर नक्की कोणत्या काळात सुरु झाली याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. इतिहासकारांमध्ये मोडीच्या उगमाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. देवगिरीच्या यादव साम्राज्यात करणाधीप पदावर असलेले हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांनी मोडीचा वापर राजकारभारासाठी मोडीचा वापर करण्यास सुरुवात केली असे इतिहासकारांचे मत आहे.
मोडीचा वापर करुन लिहिलेली ऐतिहासिक दस्तऐवज, कागदपत्रे, ताम्रपत्रे यांचे वाचन होणे गरजेचे आहे, तसेच मोडीचा वापर आजच्या पिढीनेही आपल्या दैनदिन कामात थोड्याफार प्रमाणात करण्यास सुरुवात केली तरच मोडी लिपीचा हा वारसा पुढिल पिढीला देवू शकतो. वर्तमानकाळातील मोडी लिपीचा वापर भविष्यात मोडी लिपीचे अस्तित्व अबाधित ठेवू शकतो. आज मोडी लिपीचा वापर बरेच लोक आपल्या दारावरील नावाच्या पाट्या, वा सोशल मिडीयावरील वापरायचे हेडर असे छोटेछोटे प्रयत्न करुन मोडीचा प्रचार, प्रसार आपल्याआपल्या पातळीवर करत आहेत, त्यांचे कार्य मोडी प्रचारासाठी स्त्युत्य आहेच. पण असा वापर मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.
तसेच बरेच मोडी अभ्यासक, प्रशिक्षक आपल्या स्तरावर मोडीचा प्रचार,प्रसार करताना दिसतात. मोडी लिपी कशी शिकावी यासाठी बरीच पुसतके आज उपलब्ध आहेत, तसेच मोडी प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक या शहरात होताना दिसतात. तसेच स्वातंत्रवीर सावरकर यांची जन्मठेप संपूर्णपणे मोडी लिपीत टंकीत करुन पुस्तक तयार केले आहे. तसेच राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे चरीत्राचे ई–पुसतक, तसेच अन्य महापुरुषांची चरित्रे मोडी लिपीतील ई–पुस्तके व पुस्तके येत आहेत ही मोडीच्या प्रसारासाठी महत्वाची बाब आहे.
मध्ययुगीन महाराष्ट्राचे वैभव, वारसा असलेली मोडी लिपीचा वापर इ.स. २०१६ साली प्रदर्शीत झालेल्या एका चिनी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट ह्एन–त्सांग (XuanZang) यामध्ये झालेला आढळतो. सदरच्या चित्रपटामध्ये भारतातील दस्तऐवज, कागदपत्रे, तसेच पत्रव्यवहारासाठी भाषा संस्कृत व लिहिण्यासाठी मोडी लिपीचा वापर केलेला दिसतो. त्या चिनी लोकांच्या चित्रपटामध्ये भारतीय कलाकारांनी काम केले आहे.
सातव्या शतकात भारतात आलेला चिनी विद्वान प्रवासी ह्एन–त्सांग (XuanZang)(इ.स.६०३–इ.स.६६४) यांच्या भारत प्रवासाचे अनुभव या चित्रपटामध्ये चित्रीत केले होते. हा चिनी विद्वान प्रवासी ज्ञानाच्या आणि योग्य गुरुच्या शोधात भारतात आला. भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला. काश्मिरपासून तक्षशिला, मथुरा, काशी, कपिलवस्तू, पाटलीपुत्र, नालंदा अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. याकाळात त्याने वेद, भाषा, व्याकरण, आयुर्वेद, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. इ.स.६४५ मध्ये तो चीनला परत गेला.
चिनी चित्रपट ह्एन–त्सांग (XuanZang) यासाठी केलेले मोडी लिपीचे लेखन मुंबईतील ‘‘जागतीक मोडी लिपी प्रसार समिती’’ या संस्थेचे श्री.सुहास पटवर्धन, व श्री.रवींद्र भगवते यांनी करून दिले आहे. मोडी लिपीचा वापर चिनी ऐतिहासिक चित्रपटामध्ये होतो पण आपल्या देशातील ऐतिहासिक चित्रपटामध्ये मोडीचा वापर का होऊ शकत नाही? व आपल्यातील चित्रपट निर्देशकांना मोडीची ऐतिहासिक पार्श्वभुमी माहित नाही का? हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे.