मी माझ्या व्यावसायिक कामानिमित्त श्रीलंकेलाही जाऊन आलो आहे. “श्रीलंका’ हा भारताच्या दक्षिणेकडील लहानसा देश आहे. या देशाचे पूर्वीचे नाव “सिलोन’ असे होते. इ.स.पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतातून ‘विजय’ नावाच्या राजाने सिलोनमध्ये जाऊन राज्य स्थापले. तसेच रामायणामध्ये उल्लेख झालेली रावणाची लंका म्हणून श्रीलंका आपल्याला परिचितच आहे.
विविध कालखंडात भारतीय व इतर देशीय लोकांनी श्रीलंकेमध्ये स्थलांतर केले आहे. श्रीलंका हा देश भारतीयांचा शेजारी देश असून भारताबरोबर सार्कचा सदस्य देशही आहे. श्रीलंकेला मी माझ्या कामानिमित्त गेलो होतो. “लंकेत सोन्याच्या विटा, पण पाहिल्यात कुणी ?’ अशी एक म्हण आपल्या भाषेत नियमित वापरत असतो. खरेच लंकेत सोन्याच्या विटा आहेत का, हा प्रश्न पूर्वी मला सतवायचा. तसेच रामायणात सांगितलेली तशीच लंका असेल का, असाही प्रश्न मनात यायचा. त्यात काही वर्षापूर्वी संशोधकांनी रामसेतू शोधला होता. त्याची माहितीही कानावर पडलेली होती. त्यामुळे श्रीलंकेविषयी नेहमीच कुतूहल असायचं. बरं, हा देश आपल्या देशाबरोबर क्रिकेट हा खेळही खेळतो. तसेच त्यांचे खेळाडू आपल्या आयपीएलमध्ये खेळतात. त्यामुळे या देशात जाण्यापूर्वी मनात फारच उत्सुकता होती.
श्रीलंकेमध्ये EDNA नावाची एक कंपनी आहे. “श्रीलंकन टाटा’ असेही तिला म्हणतात. जसा टाटा ग्रुप आपल्या देशात खूप मोठा आहे. मिठापासून ते विमान सेवेपर्यंत टाटा कंपनी आपल्या भारतात सेवा देतात त्याच प्रकारे EDNA ग्रुप श्रीलंकेमध्ये नानाविध सेवा पुरवतात. या ग्रुपला मी आमच्या कंपनीमार्फत मशीन विकले होते. त्यासाठी मला श्रीलंकेला जाण्याचा योग आला.
श्रीलंकेत हायवेची संख्या खूप कमी आहे. मी गेलो होतो, त्यावेळी फक्त एकच हायवे सुरू होता, तोही विमानतळापासून कोलंबो शहरापर्यंत. त्याच्यावर जाण्यासाठीही टोल द्यावा लागतो. इतरत्र देशात रस्ते आहेत. विशेष म्हणजे रस्ते लहान असूनही रस्त्यावर औषधालाही खड्डा सापडणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने सर्व रस्त्यांचे व्यवस्थापन केलेले आहे. वाहतूकीची शिस्त अप्रतिम अशी आहे. जर एखादा पादचारी रस्ता ओलांडतो आहे व समोरून एखादी गाडी झेब्रा क्रॉसिंगवरून येत असते व त्या गाडात कितीही मोठी व्यक्ती असली तरीही ती गाडी क्रॉसिंगच्या अगोदर थांबते. पादचाऱ्याने रस्ता ओलांडल्यावरच गाडी निघून जाते. या दरम्यान एकदाही गाडीचालक हॉर्न वाजवत नाही. हे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
कोलंबो शहराअंतर्गत रस्ते मोठे आहेत. लेन सिस्टीमनेच वाहनचालक वाहन चालवत असतात. खूप कमी वेळा हॉर्नचा आवाज ऐकू येतो. जर तुम्हाला काही कारणास्तव शहरात एखाद्या ठिकाणी गाडी पार्क करायची आहे, पण ती जागा पार्किंगसाठी अयोग्य असेल, त्याने दुसऱ्या कोणाला तर त्रास होईल, असे तुम्हाला वाटत आहे ; तर ते लोक आपल्या मोबाईल नंबरची चिठ्ठी वा नेमकार्ड ड्रायव्हरसमोरच्या काचेला लावतात. जर कोणाला गरज पडली अन् गाडी काढावी लागत असेल तर त्वरीत संपर्क करता यावा, अशा उदात्त उद्देशाने नंबर काचेवर लावला जातो.
शहरात अजूनही बऱ्याच मुली पारंपारिक वेषात दिसतात. त्यांची त्यांच्या संस्कृतीशी असलेली नाळ अजूनही तुटलेली नाही, असे दिसते. श्रीलंकेमध्ये कॅन्डीयन स्टाईलची साडी हा त्यांचा पारंपारिक पेहराव आहे. तो अतिशय सुंदर असा साडीप्रकार आहे. देशात अजूनही बऱ्याच सुधारणेला वाव आहे. ते त्यात कार्यरतही आहेत. पण आपल्या संस्कृतीला न विसरता त्यांचे हे कार्य चालू असल्याचे दिसते. कोलंबो शहरात समुद्रकिनाऱ्याला लागून रेल्वेचे ट्रॅक आहेत आणि मग रस्ता. कोलंबोमध्ये आजही रेल्वे बऱ्याच जुन्या पद्धतीची असते. टाइम मशिनमध्ये बसून आपणच आपल्या भुतकाळात जाऊन रेल्वे पाहतो आहोत, असे वाटत होते. पण त्यांच्याही दृष्टीने बरोबर आहे. कारण यापूर्वी त्यांचा विकास न होण्याचे कारण म्हणजे, लिट्टेंचे सरकारबरोबर असलेले गृहयुद्ध. गनिमी पद्धतीची लढाई.
मी बऱ्याच लोकांबरोबर या विषयी बोललो तेव्हा असे कळाले कर, प्रत्येक घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला आपण शेवटचे भेटतो आहे, असे समजून ते निरोप द्यायचे. कारण कधी कोठे बॉम्ब पडेल वा गोळीबार होईल, याची पूर्वकल्पना सर्वसामान्य लोकांना नसायची. अंतर्गत यादवीमुळे या देशाचा मुलभूत विकास झालेला नाही. पण भविष्यात तो विकास खूप चांगल्या प्रकारे होईल, याची सुरूवात त्यांनी आपल्या शिस्तप्रियता तसेच कामाच्या अचुकतेने केली आहे.
देशातील नागरिकांमध्ये “प्रभाकरन’ या नावाची दहशत ऐकतानाही अंगावर शहारे येत होते. मग श्रीलंका सरकारने प्रभाकरनला मारून हे खूप वर्षे चाललेले युद्ध थांबवलेले आहे. आता खऱ्या अर्थाने त्यांची वाटचाल प्रगतिपथावर चालली आहे. श्रीलंकेमध्ये भारतीय लोक बरेच दिसले. ते पूर्वीपासूनच तिथे राहतात. त्यांनी तिथे उद्योग व्यवसाय चालू केले आहेत.
भारतीयांमधील तामिळ नागरीक खूप आहेत. श्रीलंकेमध्ये रस्त्यावर असलेले फलक इंग्रजी, सिंहली व तमिळ या तीन भाषांत असतात. रस्त्यावर बऱ्यापैकी सर्व मोटरसायकल बजाज व हिरोच्या असतात. चार चाकी गाड्या मात्र सगळ्या ब्रँडच्या पाहण्यास मिळतात. अशाही बऱ्याच गाड्या पाहिल्या की, ज्या अजून भारतात आलेल्या नाहीत. श्रीलंका हा देश या सर्व गोष्टी आयात करतो. सदरचे कोणतेही वाहन उत्पादन ते देशात करत नाहीत.
देशात निसर्गसौंदर्य पुष्कळ प्रमाणात आहे. तसेच त्यांनी ते अजूनही अबाधित ठेवले आहे. शहराच्या बाहेर पडल्यावर रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडे दिसतात. डोंगरात विपुल प्रमाणात विविध झाडे पाहण्यास मिळतात. बांबूचा वापर खूप झाल्यामुळे बांबूंचेही प्रमाण प्रचंड आहे. शहराबाहेरील घरे ही नैसर्गिक स्त्रोतांचा जास्त वापर करून बांधलेली आहेत. श्रीलंकेला “पाचूचे बेट’ असे म्हणूनही संबोधले जाते. कारण शेतीयोग्य जमीन, घनदाट जंगले, भरपूर पाऊस या सगळ्यामुळे सदैव हिरवेगार वातावरण पाहण्यास मिळते. चहा व रबर ही प्रमुख दोन पिके येथे घेतली जातात.
कॅन्डी तील कंपनीचे काम झाल्यावर मी एका मंदिराला भेट दिली. कँडी या शहरात एक प्राचीन बुद्ध मंदिर आहे. त्याचे नाव आहे, “टेंपल ऑफ टूथ (दंत मंदिर). कँडी हे शहर श्रीलंकन राजाची शेवटची राजधानी होती. या मंदिराविषयी एक अख्यायिका अशी आहे की, हेमामाली या राजकुमारीने गौतम बुद्धाच्या अंत्यक्रिया विधीनंतर त्यांचा एक दात आणला. त्यासाठीच पुढे हे मंदिर निर्माण केले गेले. म्हणूनच या मंदिराला टेंपल ऑफ टूथ असे म्हणतात. मंदिर पाहताना राजेशाही थाटाची कल्पना येते. प्रत्यक्षात मात्र आता तिथे कोणीही राजा राज्य करीत नाही. सदरचे मंदिर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून युनेस्कोने घोषित केले आहे. मंदिरात आजही पारंपारिक पद्धतीने पुजा-अर्चा केली जाते. कँडी ढोल एका विशिष्ट पद्धतीने वाजवून पूजा पार पाडली जाते.
मंदिराच्या भोवती एक सुंदरशी बाग आहे. एक नयनरम्य तळेही आहे. या सर्व गोष्टी पाहताना सर्व चिंतांचा विसर पडतो. सदरच्या मंदिरात 1998 मध्ये लिट्टेच्या आतंकवादी हल्ल्यामुळे नुकसान झाले होते. मंदिरात आता सुरक्षेला फार महत्व आहे. खूप दूरपासून पायी चालत मंदिराकडे जावे लागते. कोणत्याही प्रकारच्या वाहनांना मंदिराजवळ आणण्यास मनाई आहे. पायी चालत जाण्याने होणारा त्रास मंदिरातील शांत, सात्विक, प्रसन्न वातावरणात नाहीसाच होतो. श्रीलंका या देशात वाहतुकिचे शिस्त अप्रतिम आहे. लोक अतिशय धार्मिक आहेत. श्रीलंकेला निसर्गाची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे.
© 2023. All right reserved.